PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:15 PM2024-04-11T13:15:10+5:302024-04-11T13:15:27+5:30

Varanasi Lok Sabha Election 2024: २०१९ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकले होते. तर काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

lok sabha election 2024 will the pm narendra modi could hat trick in varanasi know about poll date history and india alliance position | PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास

PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास

Varanasi Lok Sabha Election 2024: देशभरात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा जास्त कल असतो. भाजपाने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर, देशपातळीवर इंडिया आघाडीने एकत्रितपणे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून हॅटट्रिक करणार का की, इंडिया आघाडी तगडे आव्हान देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांसाठी सर्व सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघात सातव्या टप्प्यात ०१ जून रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ०४ जून रोजी आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भाजपकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अखिल भारत हिंदू महासभेने येथून किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना उमेदवारी देत वाराणसीतून लोकसभा रिंगणात उतरवले आहे. 

वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसी शहराला धार्मिक महत्त्व आहे. हिंदूंबरोबरच वाराणसी बौद्ध आणि जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. या शहराचा राजकीय इतिहास पाहिला तर २००९ पासून या ठिकाणी भाजपाचे वर्चस्व आहे. १९९  च्या दशकातही ही जागा भाजपाकडेच होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हाही नरेंद्र मोदींनी विक्रमी मतांसह मोठा विजय नोंदवला होता.

२०१९ मध्ये वाराणसीत नरेंद्र मोदींना किती मते मिळाली होती?

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींनी ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. तर समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांना ०१ लाख ९५ हजार १५० मते मिळाली होती. वाराणसीची जागा नरेंद्र मोदी ०४ लाख ७९ हजार ५०५ एवढ्या फरकाने जिंकली. काँग्रेसच्या अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अजय राय यांच्यावरच काँग्रेसने पु्न्हा एकदा विश्वास दाखला आहे. मात्र, अजय राय यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांमधील फरक वाढणार की कमी होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १९९१ च्या नंतर भाजपाला केवळ एकदाच वाराणसीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्राप्त आकडेवारीनुसार, वाराणसीमध्ये १८.५४ लाख मतदार आहेत. ज्यामध्ये १०.२७ लाख पुरुष आणि ८.२९ लाख महिला मतदार आहेत. येथे ब्राह्मण, भूमिहार, वैश्य, कुर्मी मतदार मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय मुस्लिम मतदारांची संख्याही चांगली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कँट आणि सेवापुरीचा असे भाग येतात. २०२२ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या होत्या.
 

Web Title: lok sabha election 2024 will the pm narendra modi could hat trick in varanasi know about poll date history and india alliance position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.