वाराणसी - Narendra Modi Road Show ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात होत असताना वाराणसी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोड शोसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. इतकेच नाही तर काशी वाराणसीतील मराठी समाजानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठमोळं स्वागत करत आपण सगळे मोदींच्या पाठीशी असल्याचं ठामपणे सांगितले.
गेली १० वर्ष आमचे खासदार राहिलेले नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगलं काम केले असून इथली रुपरेखा त्यांनी बदलून टाकली आहे. गेल्या २-४ पिढ्यापासून आम्ही इथं राहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीतील ब्राह्मणांनी केला होता. काशीतील ८० पैकी ६५ घाट हे मराठी समाजाने बांधलेले आहेत. काशीतील मराठी समाज मोठ्या प्रमाणात आहे असं इथले रहिवासी संतोष पाटील यांनी म्हटलं.
तर ५० वर्षात जे घडलं नाही तसं वाराणसीत गेल्या १० वर्षात दिसतंय, सगळीकडे विकास दिसतोय. काशी विश्वनाथ धाम, रिंग रोड, रोप वे, गावागावात रस्ते बनले आहेत. जल वाहतूक वाढवली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. सगळ्यांसाठी मोदींनी विकास केला आहे. मी मराठी असले तरी या भागाची २ वेळा नगरसेविका राहिली आहे. त्यातून विभागासाठीही काम केले आहे असं भाजपाच्या मराठी महिला पदाधिकाऱ्याने सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीशी या मराठी लोकांनी संवाद साधला.
दरम्यान, मोदींनी देशाचा गौरव जगात वाढवला आहे. परदेशात भारतीयांना सन्मानाने वागणूक दिली जाते, ते मोदींमुळे शक्य झाले आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदीतून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मराठी जनतेने व्यक्त केला. काशीतील मराठी समाज हा नरेंद्र मोदींच्या मागे उभा आहे. विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. महाराष्ट्रातही भाजपाला यश मिळेल. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राज्याचा विकास सुरू आहे तो मतदानातून दिसेल असंही तिथल्या मराठी जनतेनं म्हटलं.