आझमगड - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान संपलं आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी आझमगड जिल्ह्यातील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते. मात्र अखिलेश यादव यांच्या सभेत मोठ्या प्रमाणात गदारोळ उडाला.
सभेतच दगडफेक आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. या गोंधळात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रसाद सरोज यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर अखिलेश यादव पोहचले तेव्हा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून अखिलेश यादव यांच्या दिशेने धावत आले. यावेळी कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. लोकांनीही दगड आणि खुर्च्या फेकल्या.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पाहू शकता की, व्यासपीठाच्या दिशेने धावताना कार्यकर्ते एकमेकांना मागे ढकलत आहेत. इतकेच नाही तर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर चढून धावतायेत. ज्या स्टँडवर लाऊड स्पीकर लावण्यात आले होते तेदेखील खाली पडले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांवरही खुर्च्या फेकल्या. अखिलेश यादव सातत्याने व्यासपीठावरून लोकांना शांत राहण्याचं आवाहन करत होते. परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही.
रविवारीही फुलपूर येथील अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या सभेत गर्दी उसळून आली. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून व्यासपीठाजवळ पोहचले. वारंवार कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केले जात होतं. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भाषण आटोपतं घेतले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रविवारीही उडाला गोंधळ
रविवारीही फुलपूर लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अमरनाथ मौर्य यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अचानक गोंधळ झाला होता. उत्साहाच्या भरात लोकांनी बॅरिकेडस तोडून मंचावर जाण्याचा प्रयत्न केला. फुलपूर मतदारसंघातील पडिला महादेव येथे ही सभा आयोजित केली होती. राहुल व अखिलेश मंचावर आले असताना उत्साहित लोक मंचावर चढले. त्यामुळे मंचावर जागाच शिल्लक राहिली नाही. स्थानिक नेत्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. लोकांना रोखताना पोलिसांनी कसरत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस सौम्य लाठीमार करणार होते, मात्र राहुल व अखिलेश यांनी त्यांना रोखले. पोलिसांनी वेळीच गर्दी नियंत्रित केली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते दान बहादूर मधुर यांनी दिली होती.