उत्तर प्रदेशात असलेल्या गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून, गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करण भूषण सिंह हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.
अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्यूनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील करनैलगंज हुजूरपर मार्गावर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि कैसरगंजचे भाजप उमेदवार करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले.
घटनेनंतर, करण भूषण यांचा ताफा तेथे थांबलाही नाही, ना करण भूषण यांनी उतरून मुलांची स्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. ताफा मुलांना चिरडून निघून गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर, घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. तसेच, स्थानिक लोकांनी रस्ता रोखो करत कारवाईची मागणी केली आहे.