मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:16 PM2023-07-21T16:16:59+5:302023-07-21T16:17:46+5:30

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत, त्यामुळे सर्व पक्ष या राज्यासाठी विशेष रणनीती आखत आहेत.

Loksabha Election: BJP's power will increase in Uttar Pradesh; 3 parties preparing to join NDA | मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत

मिशन 2024: उत्तर प्रदेशात भाजपची पॉवर वाढणार; 3 पक्ष NDA मध्ये सामील होण्याच्या तयारीत

googlenewsNext

Loksabha Election: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक INDIA आघाडीमध्ये विविध पक्षांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, तर भारतीय जनता पक्षही एनडीएमधील पक्ष वाढवण्यावर भर देतोय. भाजपने नुकतीच 38 पक्षांसोबत एनडीएची बैठक घेतली, आता आणखी चार पक्ष या संघटनेत सहभागी होऊ शकतात. उत्तर प्रदेशातील तीन आणि बिहारमधील एक प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्षासोबत येऊ शकतात. हे पक्ष भाजपसाठी नक्कीय फायदेशीर ठरू शकतात.

उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 80 खासदार लोकसभेवर निवडून जातात. असे म्हटले जाते की, उत्तर प्रदेश जिंकले तर संसदेचा मार्ग सोपा होतो. त्यामुळेच सर्वजण उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष देत आहेत. यातच आता मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील प्रगतीशील मानव समाज पार्टी (बिंध समाज), जनवादी पार्टी आणि महान दल एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. तर मुकेश साहनी यांचा बिहारमधील व्हीआयपी पक्षही एनडीएचा भाग होण्याच्या तयारीत आहे.

भाजपला या तीन पक्षांचा फायदा?
प्रगतीशील मानव समाज पक्षाचे अध्यक्ष प्रेमचंद बिंद आहेत. पक्ष केवट समाजाशी संबंधित असून, अति मागास समाजामध्ये पक्षाची चांगली पकड आहे. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु जागांबाबत बोलणी होऊ शकली नाहीत. दुसरीकडे जनवादी पक्षाच्या संजय चौहान यांचे समाजवादी पक्षाशी जवळचे संबंध होते. त्यांनी सपासोबत चंदौलीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.

याशिवाय, केशव देव मौर्य यांचा पक्ष महान दल देखील एनडीएमध्ये सामील होण्यास तयार आहे. पक्षाचा दावा आहे की, रोहिलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांची पकड आहे. विशेष म्हणजे एनडीएमध्ये सामील होण्यास तयार असलेल्या यूपीतीय या तिन्ही पक्षांनी यापूर्वी समाजवादी पक्षाशी युती केली आहे.

युपीत भाजप मजबूत
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप एनडीएला मजबूत करत आहे. यूपीमधील इतर अनेक पक्षही एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष, संजय निषाद यांच्या पक्षाचाही समावेश आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने युपीत 64 जागा मिळवल्या होत्या, तर बसपाला 10 आणि सपाला 5 जागा मिळाल्या. गत निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती.
 

Web Title: Loksabha Election: BJP's power will increase in Uttar Pradesh; 3 parties preparing to join NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.