तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली. या ट्रेनच्या टुरिस्ट कोचमधील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही ट्रेन लखनऊहून रामेश्वरमला जात होती. या आगीत २० जण जखमी झाले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनुसार आग लागल्याची माहिती पहाटे सव्वा पाच वाजता मिळाली. यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबलेली होती. काही प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन प्रवास करत होते.
आग लागल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये कोचला भीषण आगीने वेढल्याचे दिसत आहे. तसेच आजुबाजुचे लोक ओरडत असल्याचेही ऐकायला येत आहे. या वेळी बाजुच्या रुळावरून दुसरी रेल्वे जात होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे डब्यात कोणतीही ज्वलनशील सामग्री घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मृतांमध्ये सर्व उत्तर प्रदेशचे आहेत. लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनच्या काही प्रवाशांनी डब्यात चहा बनवायला सुरुवात केली. त्यानंतर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.