उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजभवनाजवळच्या रस्त्यावर एका महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेवर ही वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. या महिलेच्या पतीने आपबिती सांगितली. ब्रजेश कुमार सोनी असं या व्यक्तीचं नाव असून तो चार मुलं आणि पत्नी सह भाड्याच्या घरात राहतो. उदरनिर्वाहासाठी कधी मजुरीचे काम करतो तर कधी भाजीचा स्टॉल लावतो.
ब्रजेश सोनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती वेदना होत असल्याने पत्नीला जवळच्या श्यामा प्रसाद मुखर्जी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी पत्नीला हातही लावला नाही. इंजेक्शन आणि औषधे देऊन पाठवलं. गर्भवती पत्नीला घरी आणल्यावर अचानक वेदना पुन्हा वाढल्या. रिक्षातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वेदना वाढल्या. अखेर स्थानिक महिलांच्या मदतीने रस्त्यावरच प्रीमॅच्योर डिलिव्हरी झाली.
ब्रजेश म्हणाला - "माझ्यासाठी कोणताही सरकारी नंबर अर्थहीन आहे. कोणीही अधिकारी गरिबांचं ऐकत नाही. शेवटी तक्रार करायची कुठे? ज्याप्रमाणे सरकार लोकसंख्येची जनगणना करते, मतदार यादी तयार करतं, त्याचप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याला प्रत्येक परिसराची जबाबदारी दिली तर गरीब कुटुंबाचं जीवन कसे चालले आहे, हे त्याला कळू शकेल. तरच शासकीय योजनांचा लाभ मिळेल, अन्यथा सर्व काही अर्थहीन आहे."
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांचीही भेट घेतली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "एक तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि त्यात राजभवनासमोर… तरीही रुग्णवाहिका न आल्याने एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांना यावर काही बोलायचे आहे की नाही किंवा असे म्हणायचे आहे की आमच्या भाजपच्या राजकारणासाठी बुलडोझर आवश्यक आहे, जनतेसाठी रुग्णवाहिका नाही."
अखिलेश यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला रस्त्याच्या कडेला साडीचा पडदा करून महिलेच्या प्रसूतीसाठी कशी मदत करत आहेत, हे पाहायला मिळत आहे. शेजारी रिक्षा उभी आहे. रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्यामुळे गर्भवती महिला रिक्षाने रुग्णालयात जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर रिक्षा थांबवून तिची डिलिव्हरी रस्त्याच्या कडेला करण्यात आली. मात्र बाळाला वाचवता आलं नाही. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.