वाराणसी : जवळपास तीन दशकांपासून प्रतिक्षेत असलेल्या अवधेश राय हत्या प्रकरणात माफिया आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीला दोषी ठरविण्यात आले आहे. वाराणसीच्या एमपीएमएलए कोर्टाने हा निकाल दिला आहे. अन्सारीला आता किची शिक्षा होणार याचा निर्णय दुपारी दोन वाजता सुनावला जाणार आहे.
अवधेश राय हत्या प्रकरण हे ३२ वर्षांपूर्वीचे आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या अन्सारीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सुनावणीनंतर कोर्ट परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात अन्सारीला चार प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतू, या सर्व प्रकरणांत अवधेश राय हत्याकांड महत्वाचा आहे. अन्सारी याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकणार आहे.
3 ऑगस्ट 1991 रोजी अवधेश राय यांची वाराणसीतील लहुराबीर येथे त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. व्हॅनमधील हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून अवधेश यांचा खून केला होता. घटनेच्या वेळी लहान भाऊ अजय रायही तिथे होता. तिथून हाकेच्या अंतरावर चेतगंज पोलीस ठाणे होते.
मुख्तार अन्सारी याच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह आणि राकेश श्रीवास्तव उर्फ राकेश ज्युडिशरी यांची देखील या हत्या प्रकरणात नावे होती. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी अन्सारीने कोर्टातून केस डायरी गायब केली होती. अवधेश राय यांचा भाऊ आणि माजी आमदार अजय राय यांनी मुख्तार अन्सारी सह अन्य आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला होता.
दोन आरोपींचा मृत्यूमुख्तार अन्सारी सध्या बांदा तुरुंगात आणि भीम सिंग गाझीपूर तुरुंगात आहे. तर कमलेश सिंह आणि अब्दुल कलाम यांचा मृत्यू झाला आहे. पाचवा आरोपी राकेश याने या प्रकरणाची फाईल वेगळी केल्याने त्यावरील प्रयागराज सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.