उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे बांधकाम सुरू असलेल्या घराचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. बांधकाम सुरू असलेल्या या घराचं स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ मुलांसह १५ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या १३ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मदत अभियान चालवले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मवई गावातील हरचरण सिंह यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर स्लॅब घालण्याचं काम सुरू होतं. काल संध्याकाळी दुसऱ्या मजल्यावरील तीन खोल्यांवर स्लॅब घालण्यात आलं. त्यानंतर घराततील सदस्य खालच्या मजल्यावर झोपले. त्यामुळे स्लॅब कोसळले तेव्हा ते त्याखाली दबले गेले.
या दुर्घटनेत राजपाल, त्यांची पत्नी सुनिता यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यादरम्यान, सीओंसह अनेक पथके मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.