उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रीचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे. मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने जळत्या चितेवर उडी मारून टोकाचं पाऊल उचललं आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक शाळेपासून दोघे जण एकत्र शिकले आणि एकत्र पुढे गेले, पण शनिवारी एका मित्राचा कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा दुसऱ्याला हे दु:ख सहन झाले नाही. आधी तो स्मशानभूमीवर खूप रडला, नंतर जळत्या चितेवर उडी मारली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशन नागला खंगार परिसरातील स्वरूप घाटातील आहे. आनंद गौरवचा मित्र अशोक याचा शनिवारी कॅन्सरने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 वर्षांची मैत्री संपुष्टात आली तेव्हा गौरवला हा धक्का सहन झाला नाही. अशोकाची चिता जळत असताना आनंदने त्यात उडी घेतली. लोकांना काही समजेपर्यंत आनंद 95 टक्के भाजला होता. घाईगडबडीत त्याला उपचारासाठी आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.
आनंद हा फिरोजाबादच्या गढिया पंचम गावचा रहिवासी आहे. आनंद आणि अशोक यांनी प्राथमिक शाळेतून एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. अशोक सहा महिन्यांपासून आजारी होता. महिनाभरापूर्वी डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. अशोकने शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. यानंतर यमुनेच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता पेटवून सर्वजण घरी परतायला लागले, पण गौरव तिथेच बसून रडत राहिला. त्यानंतर अचानक त्याने जळत्या चितेत उडी घेतली. चितेला लागलेल्या भीषण आगीमुळे गौरव 95 टक्के भाजला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एसपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, गौरवला त्याच्या मित्राचा मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. अशोकचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि परतायला सुरुवात केली. तेव्हाच गौरवने जळत्या चितेत प्रवेश केला. गंभीररित्या जळालेल्या गौरवला प्रथम फिरोजाबाद आणि नंतर आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि गौरवला ते सहन होत नव्हते. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.