उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या वृंदावनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गौरा नगर येथील रहिवासी असलेल्या आनंद अग्रवाल यांचे लग्न हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन पाल मंगला यांची मुलगी रेखा हिच्यासोबत ठरलं होतं. 10 मे रोजी लग्नाची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेला आणि वेळेत दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं. 11 मे रोजी सकाळी पाठवणी झाल्यानंतर रेखा सासरच्या घरी पोहोचली आणि गोंधळ घालू लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावनच्या गौरानगर येथील कौशल किशोर अग्रवाल यांचा मुलगा आनंद याचा विवाह होडल येथील रहिवासी लखन पाल यांची मुलगी रेखासोबत बुधवारी विधिवत संपन्न झाल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारी सकाळी पाठवणी झाल्यावर रेखा सासरच्या घरी पोहोचताच तिने गोंधळ घातला आणि विचित्र वागण्यास सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात याची जोरदार चर्चा रंगली. नववधूच्या नातेवाईकांना यानंतर तातडीने बोलावण्यात आले. मात्र प्रकरण पुढे वाढत जात असल्याचं पाहून आनंदच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पती आनंदने सांगितले की, खोलीतून बाहेर पडल्यानंतर पत्नी रेखाने घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जणू काही तिला वेडेपणाचा झटका आला आहे. मानसिक रित्या अस्वस्थ असलेल्या मुलीशी लग्न लावून सत्य लपवल्याचा आरोप नवरदेवाने केला आहे.
सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा भाऊ विनोद याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. यानंतर रेखाच्या भावाने जे काही सांगितलं त्यानंतर वर आनंद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. विनोदने सांगितले की, त्याची बहीण मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. यावर आनंदने पोलिसांना फोन करून आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.