राजेंद्र कुमार
लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्ष मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंद हा अपरिपक्व आहे, असे जाहीर करून त्यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून गेल्या ७ मे रोजी हटविले होते. मात्र ४६ दिवसांनी मायावती यांनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. उत्तराखंड, पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आकाश आनंद बसपचे स्टार प्रचारक म्हणून सक्रिय होणार आहेत.
या पोटनिवडणुकांसाठी बसपच्या जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मायावती यांच्यानंतर आकाश आनंद यांचे नाव आहे. पक्षाच्या २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीला आकाश आनंद उपस्थित राहतील. आकाश आनंद यांचा राजकीय प्रवास सात वर्षांपूर्वी सुरू झाला. २०१७ साली
मायावती यांचे खासगी सचिव म्हणून ते काम पाहू लागले. पुढे सक्रिय झाले. प्रचारसभांमध्ये ते मायावती यांच्यासोबत असायचे. त्यानंतर मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक केले, त्यांना आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केले.