गोरखपूर - आपल्या गाडीवर पोलीस, पत्रकार, आमदार, खासदार नाव टाकण्याची चांगलीच फॅशन सुरू झाली आहे. अनेकदा गाडीत संबंधित व्यक्ती नसतानाही गाडीवर ही नावे टाकली जातात. तसेच, महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार अशीही नावे खासगी वाहनावर असतात. त्यामुळे, अनेकदा पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जाते. तर, कार्यकर्तेही अनेकदा नेत्यांचे फोटो लावून किंवा नेत्यांच्या नावाची नंबर प्लेट बनवून लक्ष खेचत असतात. उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका युवकाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
गोरखपूरमधील एका युवकाने आपल्या टाटा सफारी एसयुव्ही कारवर भाजपाचा झेंडा आणि विधायक ( आमदार) अशी पाटी अडकवली होती. विशेष म्हणजे त्याने गाडीवर हुटरही लावला होता. समाजात स्वत:चा रुबाब मिरवण्यासाठी युवक कार्यकर्त्याकडून असा प्रकार करण्यात येत होता. मात्र, याबाबत माहिती समजताच, थेट एसपी कृष्णकुमार बिश्नोई यांनी दखल घेत युवकाविरुद्ध कारवाई केली आहे.
पोलिसांनी केवळ युवकाची गाडीच जप्त केली नसून त्यास तुरुंगातही टाकले आहे. युवकाने अवैधपणे टाटा सफारी गाडीवर विधायक पाटी अडकवली होती. तो युवक आपल्या कारसह बाजारातून फिरू लागला, तेव्हा सिटी एसपी कृष्णकुमार बिश्नोई यांची नजर त्यावर पडली. त्यावेळी, लागलीच त्यांनी गाडी चालवणाऱ्या युवकाची चौकशी सुरू केली. त्यावर, केवळ रुबाब टाकण्यासाठी आपण गाडीला विधायक पाटी अडकवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी युवकाची कार ताब्यात घेऊन त्यास अटकही केली आहे.
एसपी बिश्नोई हे आपल्या निवासस्थानाहून पोलीस कार्यालयात पोहोचले असता, जवळच त्यांना काळ्या रंगाची टाटा सफारी कार दिसून आली. ज्यावर, विधायक ( विधानपरिष सदस्य) असे लिहिले होते. संबंधित गाडीचा नंबर चेक केल्यानंतर ही गाडी बैजनाथपूर येथील अंकितची असल्याचे समजले. मात्र, विशाल यादव ही कार चालवत होता. त्यामुळे, पोलिसांचा संशय बळावल्याने चौकशी केली असता, तो केवल रुबाब दाखवण्यासाठी आमदार नावाची पाटी लावून गावातून गाडी फिरवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विशाल यास अटक केली आहे.