मोबाईल चार्जिंगला लावून गेम खेळणाऱ्या एका मुलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने मुलगा गंभीररित्या भाजला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील आहे.
मुलाचं वय 12 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलचा जोरात स्फोट झाला, त्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मदनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बिदौरा गावात राहणारे उत्तम सिंह कामावरून घरी परतले तेव्हा त्यांनी मोबाईल चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक प्लगमध्ये चार्जिंग केबल लावली. मग ते त्यांच्या इतर कामात व्यस्त झाले. याच दरम्यान, त्यांचा मुलगा सचिन हा चार्ज असलेल्या मोबाईलवर गेम खेळू लागला.
गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला, त्यामुळे सचिन गंभीररित्या भाजला. स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी जखमी सचिनला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. सचिनचे दोन्ही हात आणि बोटे गंभीररीत्या भाजली आहेत. याआधीही चार्जिंगला असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.