मथुरा - उत्तर प्रदेशात आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमीन वाटपावरून वाद झाला. स्मशानभूमीत आईचा मृतदेह ठेवला आणि मुलींमध्ये भांडण झाले. जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोवर मृतदेहाला मुखाग्नी दिला नाही. या वादात जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. त्यानंतर तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी मुलींना खडे बोल सुनावले. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना मथुराच्या स्मशानभूमीत घडली आहे. जिथे ८५ वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुलींमध्ये जमिनीवरून वाद झाला आणि कित्येक तास आईचा मृतदेह अंत्यसंस्कारापासून ताटकळत राहिला.
स्मशानभूमीत अक्षरश: हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले पंडित विधी उरकून घरी गेले. खूप वेळ मुलींमधला वाद मिटण्याचे चिन्ह नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेले लोक आणि नातेवाईक त्रस्त झाले. त्यानंतर कायदेशीररित्या स्टॅम्प पेपरवर जमिनीचे वाटप केले गेले त्यानंतर हा वाद शमला आणि आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध महिला पुष्पाला मुलगा नाही. त्यांना ३ मुली होत्या. ज्यांचे नाव मिथिलेश, सुनीता आणि शशी. मागील काही दिवसांपासून मिथिलेश पुष्पासोबत राहत होती. मिथिलेशने बहाण्याने आईकडून दीड एकर जमीन विकून टाकली असा आरोप आहे.
यातच वृद्ध पुष्पा यांचा मृ्त्यू झाला. अशावेळी मिथिलेशसह नातेवाईक पुष्पा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले. आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सुनीता आणि शशीही तिथे आल्या. या दोन बहिणींनी मोठ्या बहिणीवर आरोप करत आईचे अंत्यसंस्कार रोखले. त्यानंतर या तिन्ही बहिणींमध्ये आईच्या संपत्तीवरून वाद झाला. मालमत्तेचे समान वाटप करण्यावरून बहिणी एकमेकांना भिडल्या. या तिन्ही बहिणी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या.
सुनीता आणि शशी आईची शिल्लक असलेली मालमत्ता आमच्या नावावर करा त्यानंतरच आम्ही अंत्यसंस्कारासाठी तयार होऊ असा हट्ट धरला. परंतु मिथिलेश त्यासाठी तयार नव्हती. या तिन्ही बहिणींमध्ये भांडण सुरू होते आणि त्याला बराच वेळ झाला. ज्यानंतर स्मशान भूमीत असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तिन्ही बहिणींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. अखेर संध्याकाळी ६ वाजता तिन्ही बहिणींमध्ये लिखित करार झाला. ज्यात मृत आईची संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर नावावर केली जाईल असं मान्य झाले. त्यानंतरच आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा वाद निकालात निघायला तब्बल ८-९ तास गेले त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला.