Mukhtar Ansari Death News:उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा बांदा मेडिकल कॉलेजमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर मुख्तारला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, आता मुख्तारच्या मृत्यूवर त्याच्या कुटुंबासह ते विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्तारच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून होती आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बांदा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान दास गुप्ता यांनी मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गरिमा सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्तार अन्सारी याच्यावरील उपचाराबाबतची सर्व माहिती तीन दिवसांत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, संपूर्ण तपास अहवाल महिनाभरात सादर करावा लागणार आहे.
कुटुंबाचा गंभीर आरोपमुख्तार अन्सारीच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुरुंग प्रशासनाने मुख्तारला स्लो पॉयझन दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यापूर्वी, मुख्तार अन्सारीने न्यायालयात असेच आरोप केले होते. तेव्हापासून या प्रकरणात अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे अनेक विरोधी पक्षही याबाबत राज्य सरकारवर टीका करत आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले-जे सरकार जीवाचे रक्षण करू शकत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. बीएसपी सुप्रीमो मायावती म्हणाल्या- मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक आहे.