गँगस्टर मुख्तार अन्सारीला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शुक्रवारी गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, न्यायालयाने दुसरा आरोपी सोनूला २ लाख रुपये दंड ठोठावला असून त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद मिश्रा यांच्या न्यायालयाने गुरुवारीच मुख्तार अन्सारीला गँगस्टर प्रकरणात दोषी ठरवले होते.
२००९ मध्ये सेवानिवृत्त शिक्षक कपिल सिंह यांची हत्या झाली होती. तसेच, त्याच वर्षी आणखी एक खून झाला होता. या दोन्ही प्रकरणात मुख्तार अन्सारी गँगस्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मुख्तार अन्सारीवर कारंडा पोलिस ठाण्यात गुंड कायद्यान्वये दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच प्रकरणात १७ मे रोजी न्यायालयाने मुख्तार अन्सारीला निर्दोष घोषित केले, मात्र आता या प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आज मुख्तार अन्सारी निराश होऊन म्हणाला की, "सर, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मी २००५ पासून तुरुंगात आहे". तर मुख्तारचे वकील लियाकत यांनी सांगितले की, हा खटला चालवण्यायोग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. तर मुख्तार अन्सारी यापूर्वी खंडणी, खून, दरोडा, अपहरण आणि इतर अनेक प्रकरणांत तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वी कारागृह शिफ्टिंगदरम्यान त्याने आपला एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली होती.