घोसी : देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर प्रदेशातील घोसी येथे सभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनीइंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्वांचल गेल्या १० वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानांची निवड करत आहे आणि पूर्वांचल गेल्या ७ वर्षांपासून यूपीचे मुख्यमंत्री निवडत आहे, त्यामुळे पूर्वांचल हे सर्वात खास असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.
घोसी, बलिया आणि सलेमपूरमधील लोक फक्त खासदार निवडत नाहीत, तर ते पंतप्रधान निवडतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, समाजवादी पार्टीवरही नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. समाजवादी पार्टीने नेहमीच षड्यंत्राखाली मागासलेला राहिला, मात्र आता माफियांसाठी अश्रू ढाळणाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्व जातींनी आपापसात लढावे अशी इंडिया आघाडीची इच्छा आहे. राजपूत, ब्राह्मण, राजभर, दलित, कायस्थ या सर्वांनी आपापसात लढून कमकुवत व्हावे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंडिया आघाडीचा फायदा काय होईल? तर जेव्हा समाजातील लोक एकत्र नसतील तेव्हा तुमचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून विचलित होईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले की, हे लोक त्यांचे मूळ तीन कट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. एक म्हणजे संविधान बदलून भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण असेल असे लिहिले जाईल. दुसरे म्हणजे, एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे आणि तिसरे म्हणजे मुस्लिमांना धर्माच्या आधारावर संपूर्ण आरक्षण देण्याची योजना आहे.
इंडिया आघाडीचे लोक राम मंदिरात त्रुटी शोधायला लागले - नरेंद्र मोदीनिवडणुकीच्या काळात इंडिया आघाडीचे लोक मंदिरांना भेटी देण्याचे नाटक करतात, पण ५०० वर्षांनंतर, जेव्हा आपल्या आस्थेचा इतका मोठा क्षण आला तेव्हा त्यांनी राम मंदिराला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्यात त्रुटी शोधायला लागले. राम मंदिराच्या उभारणीमुळे हे लोक प्रचंड नाराज झाले होते. ज्याप्रमाणे शाहबानोचा निर्णय रद्द करण्यात आला, त्याचप्रमाणे राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द करण्यात यावा, असा दबाव हे लोक सातत्याने आणत आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.