मिर्झापूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून आता सातवा टप्प्यातील मतदान बाकी आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
समाजवादी पार्टी सरकारच्या काळात जनता भयभीत होती, आता भाजपा सरकारमध्ये माफिया थरथरत आहेत. मतदानाच्या सहा टप्प्यांत तिसऱ्यांदा देशात मजबूत भाजपा-एनडीए सरकारचे पक्के झाले. भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
5 वर्षात 5 पंतप्रधान होतील, असे समाजवादी पार्टी, काँग्रेस असलेली इंडिया आघाडी सांगत आहे. मात्र, असं कुणी करतं का? कुणी मेकॅनिकही बदलत नाही. हे लोक तर पंतप्रधान बदलायला चालले आहेत. जिथे पंतप्रधान आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असतील, तिथे ते काय काम करणार? बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का? इंडिया आघाडीच्या लोकांना देशातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. हे लोक जातीयवादी, अतिपरिवारवादी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांचे सरकार बनते, तेव्हा हे लोक याच आधारावर निर्णय घेतात, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
कायदा आणि सुव्यवस्था आणि समाजवादी पार्टीचा छत्तीसचा आकडा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जे दहशतवादी पकडले गेले त्यांनाही हे समाजवादी पार्टीचे लोक सोडायचे. यात नाराजी दाखवणाऱ्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला समाजवादी पार्टीच्या सरकारने निलंबित केले. त्यांनी संपूर्ण यूपी आणि पूर्वांचलला माफियांचे सुरक्षित आश्रयस्थान बनवले होते. जीवन असो किंवा जमीन, कधी हिसकावून घेतली जाईल हे कोणालाच माहीत नव्हते आणि समाजवादी पार्टी सरकारमध्येही माफियांना व्होट बँकेनुसार पाहण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीला एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे - नरेंद्र मोदीआपल्या देशाची पवित्र राज्यघटनाही इंडिया आघाडीच्या निशाण्यावर आहे. त्यांना एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे आपले संविधान स्पष्टपणे सांगते. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तेव्हा समाजवादी पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात दलित आणि मागासवर्गीयांना ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही आरक्षण दिले जाईल, असे म्हटले होते. यासाठी राज्यघटना बदलू असेही समाजवादी पार्टीने म्हटले होते. पोलीस आणि पीएसीमध्येही मुस्लिमांना 15 टक्के आरक्षण देण्याची घोषणा समाजवादी पार्टीने केली होती. आपली व्होट बँक खूश करण्यासाठी हे लोक एससी-एसटी-ओबीसींचे हक्क कसे हिरावून घेत होते? असे म्हणत नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधला.