उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये कांवड यात्रेदरम्यान सर्व दुकानदारांनी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपापल्या दुकानासमोर आपले नाव लिहावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यावरून आता राजकीय वातावरण पेटले आहे. तसेच, जावेद अख्तर यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी यूपी पोलिसांची तुलना नाझींसोबत केली आहे.
जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, आगामी काळात कुण्या विशिष्ट धर्माच्या मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व दुकाने, रेस्टॉरंट्स आणि अगदी वाहनांवरही मालकाचे नाव ठळकपणे आणि स्पष्टपणे लिहिण्यात यावीत. अशी सूचना मुजफ्फरनगर यूपी पोलिसांनी दिली आहे. असे का? नाझी देखील जर्मनीत केवळ विशेष दुकानांना आणि घरांनाच निशान बनवत होते.
काय आहे मुझफ्फरनगर पोलिसांचा आदेश? -मुझफ्फरनगर पोलिसांनी कांवड यात्रेसंदर्भात एक आदेश जारी केला आहे. पोलिसांनी कांवड यात्रेदरम्यान मार्गावरील सर्व हॉटेल्स, दुकाने आणि ठेलेवाल्यांना आपापल्या दुकानांसमोर नाव लिहिण्यास सांगितले आहे. मात्र या निर्णयाचा बचाव करताना पोलीस म्हणाले, कांवडियांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये आणि भविष्यात कुठल्याही प्रकारचा आरोप होऊन कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी असे केले जात आहे.