देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तब्बल ४५ वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने २०८ मीटरचा टप्पा ओलांडला. या महिन्यात यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत ऐतिहासिक वाढ झाल्याने दिल्लीतपूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीतील सखल भागात पाणी साचल्यामुळे परिणाम दिसून आला. तसेच, हजारो लोकांना पुराचा फटका बसला.
आता देशाच्या राजधानीत परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, परंतु धोका पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, एक व्हिडिओ नोएडाच्या इकोटेक परिसरातून समोर आला आहे, ज्यामध्ये पूरपरिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे.
इकोटेक ३ जवळील मोकळ्या जागेत शेकडो वाहने पाण्यात बुडाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. ज्या ठिकाणी ही वाहने पुराच्या पाण्यात बुडाली आहेत, तो भाग नोएडा सेक्टर १४२ जवळ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेटर नोएडातील हैबतपूर, छोटापूर, शाहबेरी भागात पुराचे पाणी आल्यामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच गाझियाबाद बॅराजमधून हिंडन नदीत पाणी सोडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढलीशनिवारपासूनच हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे हिंडण नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पूरस्थिती पाहता प्रशासन सतर्क आहे. प्रशासन पाणी येणाऱ्या भागात लाऊडस्पीकरद्वारे लोकांना सतत घराबाहेर पडण्यास सांगत आहे. नोएडा व्यतिरिक्त गाझियाबादमध्येही हिंडन नदीला पूर आला आहे. फारुखनगर, मोहननगर, साहिबााबाद आदी भागात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, १९७८ पासून हिंडन नदीला कधीही पूर आला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती अत्यंत भयावह असून तब्बल ४५ वर्षांनंतर हिंडन नदीच्या पाणीपातळीत एवढी वाढ होताना दिसत आहे.