लखनऊ : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून सुनावणीसाठी १ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. तसेच, ही याचिका सुनावणीसाठी खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहे.
याचिकाकर्ता नृपेंद्र पांडेय यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत कनिष्ठ न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्याकडून भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले होते. तसेच, राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल फौजदारी खटला कनिष्ठ न्यायालयाने रद्द केला होता. तसेच, कनिष्ठ न्यायालयाने प्रथम हा अर्ज तक्रार म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु नंतरही तक्रार अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत याचिका फेटाळली होती.
यानंतर, कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाविरोधात जिल्हा आणि सत्र व्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांच्या न्यायालयात दाद मागण्यात आली. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला देखरेख याचिकेद्वारे (monitoring petition) आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे ही याचिका स्वीकारत जिल्हा आणि सत्र व्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी राहुल गांधी यांना नोटीस जारी करत याचिका सुनावणीसाठी खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच, या याचिकेवरील सुनावणीसाठी १ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे.