लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त तेजी आल्याचे दिसते. देश-विदेशातील मोठे हॉटेल व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अयोध्येत मालमत्ता खरेदी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अयोध्येत जमिनी आणि इमारतीच्या किमती चार ते दहा पट वाढल्या आहेत.
अनेक अनिवासी भारतीय आणि ज्येष्ठ नागरिक अयोध्येत आपले दुसरे घर बनवू इच्छित आहेत. व्यावसायिक आणि स्थानिक लोकही तेथे जमीन खरेदी करून व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. येथील मालमत्तांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.
निकालानंतरच तेजी सुरू
- ॲनारॉक समूहाचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अयोध्येत रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी सुरू झाली.
- तेव्हापासून आतापर्यंत मालमत्तांच्या किमती तब्बल ३०% वाढल्या आहेत.
- २०१९ मध्ये फैजाबाद रोडवर मालमत्तांच्या किमती ४०० रुपये ते ७०० रुपये चौरस फूट होत्या. त्या दाेन हजार रुपयांपर्यंत पोहोल्या आहेत.
भविष्यात किमती आणखी वाढणार
ऑक्टोबर २०२३च्या एका अहवालानुसार, अयोध्या शहराच्या बाहेर मालमत्तांच्या किमती १,५०० रुपये चौरस फुटावरून तीन हजार रुपये चौरस फूट झाल्या आहेत. शहरात हे दर चार हजार रुपयांवरून सहा हजार रुपयांवर गेले आहेत. सूत्रांनी सांगितले की, अयोध्येतील मालमत्तांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अयोध्येत मालमत्ता खरेदी करताना शहराचा मास्टर प्लॅन तपासून घ्यावा, असा सल्ला जाणकारांनी दिला सांगितले.