त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भगवान रामाच्या मंदिरातील गर्भगृहात रामलल्लांच्या श्यामल वर्णाच्या बनविलेल्या दोन मूर्तींपैकी एक मूर्ती विराजमान होणार आहे. हा समारंभ १८ जानेवारी रोजी दुपारी होणार असून, कोणती मूर्ती गर्भगृहात विराजमान होणार हे त्याचवेळी स्पष्ट होणार आहे. त्यानंतर २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली.
नेपाळमधील जनकपूर येथून सुमारे ४० वाहनांतून ६०० जण फळे, मिठाई अशा अनेक गोष्टी घेऊन प्रभू रामाच्या दशर्नासाठी दाखल झाले आहेत.
दोन मूर्ती संकुलात अन्य ठिकाणी स्थापित करणार
- राय यांनी याआधीच सांगितले आहे की, ५ वर्षांच्या बालकाच्या रूपात असलेली रामलल्लांची मूर्ती राममंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच तर वजन दीड टन असणार आहे.
- रामलल्लांच्या तीन मूर्ती या ट्रस्टने बनवून घेतल्या आहेत. एक मूर्ती पांढऱ्या दगडात बनविली आहे. दोन मूर्ती काळ्या रंगाच्या दगडापासून तयार करण्यात आल्या असून, त्या दक्षिण भारतातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण याेगीराज व गणेश भट्ट यांनी बनविल्या आहेत.
- गर्भगृहात जी मूर्ती विराजमान होईल, त्या व्यतिरिक्त असलेल्या दोन मूर्ती राममंदिराच्या संकुलात अन्य ठिकाणी स्थापित करण्यात येतील.
- रामलल्लांच्या दोन श्यामल रंगाच्या मूर्तींपैकी नेमकी कोणती मूूर्ती गर्भगृहात विराजमान होणार, याची माहिती राय यांनी दिली नाही.
- राममंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी एका दलाची मदत घेतली जाणार असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.