भाजपाच्या प्रखर हिंदुत्ववादी चेहऱ्यांपैकी एक असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या एका विधानावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म, इतर सर्व संप्रदाय आणि उपासना पद्धती आहेत. सनातन हा मानवता धर्म आहे. तसेच यावर आघात केल्यास जगभरातील मानवता संकटात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तामिनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट केला पाहिजे या विधानाला प्रत्युत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले आहे.
योगी आदित्यनाथ हे ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ महाराज यांच्या ५४ व्या आणि ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ महाराज यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित साप्ताहिक श्रद्धांजली सोहळ्यानिमित्त आयोजित साप्ताहिक श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञाच्या अंतिम सत्रामध्ये योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, केवळ सनातन हा एकमेव धर्म आहे. इतर सर्व संप्रदाय किंवा उपासना पद्धती आहेत. जर सनातन धर्मावर हल्ला झाला तर संपूर्ण मानवता धोक्यात येईल.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, हा नवा भारत आहे. यामध्ये देशाच्या नेतृत्वासोबत चालायची केवळ नेतृत्वाचीच नाही तर आम्हा सर्वाचीही जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षणावर लक्ष द्यावं लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे हे त्यासाठी एक संकल्पपत्र आहे. त्याआधारावर आपण देशासोबतच आपल्या जीवनातील स्वप्न साकार करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.