उत्तर प्रदेशचेआरोग्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांचं गाव असूनही हदरोईमध्ये आरोग्य सेवेतील भ्रष्टाचार कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाचेची मागणी करण्यात आली. तसेच लाच न दिल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पैसांची व्यवस्था करून सदर तरुण त्याच्या गर्भवती पत्नीला घेऊन रुग्णालयात आला. खूप विनवण्या केल्यानंतर तिला उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आले.
मात्र योग्य वेळी उपचार न मिळाल्याने सदर व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झाला. पीडित युवकाने नर्स आणि आशांविरोधात सीएमओ, डीएम, एसपी यांना विनंतीपत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सीएमओंनी तपास पथक स्थापन केलं आहे. संपूर्ण प्रकरणाचा विस्तृत रिपोर्ट मागवला आहे. त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल. हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य केंद्र बिलग्राम येथील आहे.
बिलग्राम येथील दुर्गागंज गावातील रहिवासी रिशेंद्र कुमार यांची पत्नी गर्भवती होती. रिशेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १८ मे रोजी त्यांची पत्नी मनीषा हिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला ते सार्वजनिक आरोग्य केंद्र बिलग्राम येथे घेऊन गेले. तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या तीन नर्सनी तिला रुगणालयात दाखल करून घेण्यासाठी २५०० रुपयांची लाच मागितली. जेव्हा त्याने एवढे पैसे नसल्याचे सांगितले तेव्हा या नर्सनीं त्यांना रुग्णालयातून हाकलून दिले. त्यानंतर हे पती-पत्नी गावी आले. तिथे त्यांनी १५०० रुपयांची जमवाजमव करून पुन्हा रुग्णालयात आले. तिथे खूप समजूत घातल्यानंतर त्यांच्या पत्नीला १५०० रुपये घेऊन रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
रुग्णालयात त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली. प्रसुतीनंतर त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र कुमार यांनी आरोप केला की, ड्युटीवर तैनात असलेल्या नर्स आणि आशा यांनी त्यांच्याकडे लाच मागितली. जर योग्यवेळी पत्नीला रुग्णालयात दाखल केले असते तर बाळाचा जीव वाचला असता. या बेफिकीरीमुळे जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
रिशेंद्र कुमार यांनी लाचखोरीवरून झालेल्या चर्चेचा व्हिडीओ बनवून तो जिल्हाधिकारी, एसपी आणि सीएमओ यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली आहे. या प्रकरणी सीएमओ डॉ. राजेश तिवारी यांनी सांगितले की, या प्ररणाची दखल घेण्यात आली आहे. त्यामध्ये लाचेची बाब समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.