काँग्रेस धर्मविरोधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोटा; प्रियांका गांधींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:33 AM2024-05-17T10:33:45+5:302024-05-17T10:34:22+5:30
काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करणारी
रायबरेली : काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करतो. महात्मा गांधी यांच्या मुखातून मृत्यूपूर्वी ‘हे राम’ असे उद्गार निघाले होते. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेस हा धर्मविरोधी पक्ष आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप खोटा ठरतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी सांगितले.
केरळमधील वायनाडसोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
रायबरेलीतील चौदाह मिल राऊंडअबाऊट या भागात झालेल्या प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा आरोप पंतप्रधान करतात. आम्हीच हिंदू धर्माचे अभिमानी आहोत असा भाजप दावा करतो. मात्र उत्तर प्रदेशात सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या गोशाळांची बिकट अवस्था आहे.
त्यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे लोक उपस्थित राहिले नाहीत म्हणून आम्हाला दोष दिला जातो. मात्र उत्तर प्रदेशमधील गोशाळेतील अत्यंत दयनीय अवस्थेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याकडे भाजपने लक्ष दिलेले नाही.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने गोशाळांच्या स्थितीत सुधारणा केली होती. तसेच तेथील गाईंचे शेण विकत घेतले जायचे. जेणेकरून गोशाळा चालविणाऱ्या गटांना आर्थिक मदत होईल.