काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी आपल्या सभांमधून, निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यास बँक खात्यात खटा खट खटा खट पैसे पाठवण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. त्यांच्या या आश्वासनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार. पंतप्रधान मोदींनी प्रतापगडमध्ये भाजपाचे उमेदवार संगम लाल गुप्ता यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
राहुल गांधींवर निशाणा साधताना पीएम मोदी म्हणाले, देश चालवणे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मुलांचा खेळ नाही. तुम्हाला जमणार नाही. 4 जूननंतर मोदी सरकार नक्कीच स्थापन होईल आणि आणखी बऱ्याच गोष्टी होणार आहेत.
राहुल गांधींच्या खटा खट खटा खट विधानावर मोदींनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, चार जूननंतर इंडी आघाडी तुटून जाईल खटा खट खटा खट. पराजयानंतर, बळीचा बकरा शोधला जाईल खटा खट खटा खट. लखनऊचा शहजादा (अखिलेश यादव) आणि दिल्लीचा शहजादा (राहुल गांधी) गर्मीच्या सुट्ट्यांवर देशातून बाहेर जातील खटा खट खटा खट. ये दोघे खटा खट खटा खट पळून जाणार. तेव्हा आपणच राहू.
मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडी दहा वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. त्यांची काळी कमाई संपली आहे. त्यामुळे त्यांची नजर देशाच्या तिजोरीवर आहे. आरक्षण संपवून संविधान बदलण्यासंदर्भातील आरोपांवरून पीएम मोदींनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटक-तेलंगणात काँग्रेसने अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षण दिले. त्यांना संविधान बदलून संपूर्ण देशात हेच करायचे आहे. यावर सपाचे लोक शांत आहेत. त्यांचे तुष्टीकरण एढ्यावरच थांबलेले नाही. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहाद करत आहेत. त्यांच्याच लोकांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार आल्यास, ते पुन्हा रामललांना तंबूत पाठवणार आणि मंदिराला टाळे ठोकणार.