अयोध्या : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत.
नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिरात रामललाचे दर्शन आणि पूजाही करणार आहेत. नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी ७ वाजता रामललाचे दर्शन घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर ते अयोध्येतील सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक असा जवळपास २ किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. गेल्या चार महिन्यांतील नरेंद्र मोदींचा अयोध्येतील हा दुसरा रोड शो असणार आहे.
वृत्तानुसार, नरेंद्र मोदी रविवारी दुपारी २.४५ वाजता इटावाला पोहोचतील आणि ४.४५ वाजता धारूहेराला पोहोचतील. यानंतर नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता अयोध्येतील राम मंदिराला भेट देतील आणि त्यानंतर फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ दोन किलोमीटरचा रोड शो करतील.
फैजाबादमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्याला खास बनवण्याच्या तयारीत आहे. रोड शो दरम्यान नरेंद्र मोदींवर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी अयोध्येत रोड शो करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला होता. तेव्हा नरेंद्र मोदींच्या या रोड शोमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती.