प्रतापगढ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतापगढमधील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांची इंडिया आघाडी फुटणार आहे आणि ती फुटल्यानंतर शहजादे परदेशात पळून जातील, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
प्रतापगढमध्ये भाजपाचे उमेदवार संगम लाल गुप्ता यांच्या निवडणूक रॅलीत नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रतापगढच्या स्थानिक बोली भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, "बेल्हा माई आणि बाबा घुइसरनाथ यांची पवित्र भूमी असलेल्या प्रतापगढला आम्ही नमस्कार करतो. एका बाजूला अयोध्या, दुसऱ्या बाजूला काशी आणि तिसऱ्या बाजूला प्रयागराज. प्रतापगढच्या नावातच प्रताप आहे, ही वीरांची भूमी आहे."
इंडिया आघाडीच्या लोकांना सरकार हटवायचे आहे. त्यांचा फॉर्म्युला असा आहे की, ते पाच वर्षांत पाच पीएम बनवतील म्हणजेच दरवर्षी एक पीएम. त्यांना भानुमतीचा कुनबा बनून लुटायचे आहे. ते देश बरबाद करतील की नाही? असा सवाल नरेंद्र मोदींनी केला. तसेच, उदाहरण देताना ते म्हणाले, एकदा व्यावसायिकाला कर्मचाऱ्याची गरज होती. २४ वर्षांच्या तरुणाची गरज होती. एका व्यक्तीने १२-१२ वर्षाचे तरुण आणले. त्यांना कामासाठी ठेवले जाईल का? अशीच अवस्था इंडिया आघाडीच्या लोकांची झाली आहे.
याचबरोबर, इंडिया आघाडीच्या लोकांनी २०१४ पर्यंत देशाचा नाश केला होता. सत्ता मिळाल्यावर खड्डे बुजवायला खूप वेळ लागला. स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर होती. त्यांनी ११ व्या क्रमांकावर नेऊन ठेवली. मोदींनी ती पाचव्या स्थानावर आणली. तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यास भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची गॅरंटी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, "राजवाड्यांमध्ये वाढलेल्या शहजाद्यांना असे वाटते की, विकास आपोआप होईल. कोणी कसे विचारले तर ते म्हणतील खटाखट. त्यांना कोणीतरी सांगा की रायबरेलीची जनता सुद्धा त्यांना खटाखट पाठवेल. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांच्या हातून देश चालत नाही. ४ जूननंतर इंडिया आघाडी फूटणार खटाखट… शहजादे परदेशात जातील खटाखट… आम्ही आणि तुम्ही फक्त राहणार."