उत्तर प्रदेशातील हंडिया सामुदायिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले फार्मासिस्ट प्रमोद यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. ते त्यांच्या कारने हॉस्पिटलच्या दिशेने निघाले होते. अचानक त्यांना त्रास झाला अन् तिथेच त्यांचा मृत्यू झाला. खरे तर गाडी ते स्वतः चालवत होते. घरापासून काही अंतरावर गाडी गेली असता हा प्रकार घडला. भीतीपोठी त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी यादव यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मृत फार्मासिस्ट प्रमोद यादव (५०) हे हंडिया कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत होते. ते स्थानिक झुंसी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात भाड्याच्या घरात राहत होते. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या गाडीने हॉस्पिटलला जात असताना बुधवारी त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला.
दरम्यान, बराच वेळ ते ड्रायव्हिंग सीटवर अस्वस्थ असल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा प्रमोद यादव ड्रायव्हिंग सीटवर पडलेल्या अवस्थेत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस आले तेव्हा यादव मृतावस्थेत दिसले. त्यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे ते फार्मासिस्ट असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कुटुंबीयांना फोनवरून घटनेची माहिती दिली.