उत्तर प्रदेशातील बिजनोर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी समजावून देखील काजल आणि प्रीती त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी धाडसी निर्णय घेत घर सोडले. मुलींनी अखेरपर्यंत कोणाचेच न ऐकल्याने कुटुंबीयांना देखील होकार द्यावा लागला. कोर्टाने देखील दोघींना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे.
बिजनोर येथील एका गावातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील प्रीती उत्तराखंड इथे एका फॅक्टरीत काम करायची. तिथेच तिची मैत्री मुरादाबाद येथील काजलसोबत झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी दोन्हीकडील कुटुंबीयांचा विरोध होता. घरच्यांचा वाढता विरोध पाहता प्रीती आणि काजल ५ दिवस घरातून फरार झाल्या. यानंतर प्रीतीच्या वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकात काजलविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी या दोघी पोलिसांच्या पथकाला सापडल्या. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बोलावून त्यांची समजूत काढली.
मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात!दरम्यान, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर देखील प्रीती आणि काजल या एकत्र राहण्यावर ठाम होत्या. त्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांपासून दूर राहण्यास तयार नव्हत्या. जबरदस्ती केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना बिजनोर सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. जिथे दोघींचे जबाब नोंदवण्यात आले. कोर्टातही प्रीती आणि काजल यांनी एकत्र राहण्यावर ठाम असल्याचे सांगितले. नंतर दोघीही लग्नासाठी पात्र असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली.
प्रीती अन् काजल करणार लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे कलम १६४ अंतर्गत दोघींचेही जबाब घेण्यात आले. त्या दोघीही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. त्यावर न्यायालयाने दोघींनाही प्रौढ मानले आणि त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. यानंतर दोन्ही मुली एकत्र निघून गेल्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या कुठे गेल्या आहेत हे सांगणे योग्य ठरणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.