उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे विवाहाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गर्भवती वहिनीने तिच्या दिरासोबत सप्तपदी घेऊन विवाह केली. या अजब विवाह सोहळ्यात महिलेचा पती वऱ्हाडी बनला आणि त्याने या जोडप्याला आशीर्वादही दिले. या महिलेचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती या महिलेच्या पतीला समजल्यावर त्याने पत्नीला सोबत नांदवायला नकार दिला. तसेच तिच्या गर्भात वाढत असलेलं बाळही आपलं नसल्याचा दावा केला.
मिळालेल्या माहितीनुसार जौनपूरच्या बीबीपूर गावातील बहादूर गौतम याचा विवाह २६ मे २०२३ रोजी सरायख्वाजा क्षेत्रात राहणाऱ्या सीमा गौतम हिच्यासोबत झाला होता. दोघांचा विवाह कुटुंबीयांनी धुमधडाक्यात लावून दिला होता. लग्नानंतर सीमा सासरी गेली. तसेच नवदाम्पत्याचा संसार सुरू झाला.
मात्र काही दिवसांनंतर बहादूर गौतम याने सीमाचे संबंध त्याचा धाकटा भाऊ सुंदर गौतम याच्यासोबत असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. तेव्हा आई-वडिलांनी बहादूरची समजूत काढली, त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र काही दिवसांत सीमा ही गर्भवती राहिली. त्यानंतर मात्र बहादूर याने सीमा हिला नांदवण्यास नकार दिला. सीमा हिच्या गर्भात वाढत असलेलं बाळ आपलं नसून आपला भाऊ सुंदर याचं असल्याचा दावा त्याने केला.
हळूहळू ही बाब गाववाल्यांच्या कानावर गेली. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने सीमा आणि सुंदर गौतम यांनी कोर्टामध्ये जाऊन लग्न केलं. त्यानंतर गावातील मंदिरात येऊन सप्तपदी घेतली. यावेळी सीमाचा पती बहादूर हासुद्धा वऱ्हाडी बनला. तसेच त्याने या दाम्पत्याला आशीर्वादही दिले. आता या विवाहाची चर्चा पंचक्रोशीमध्ये होत आहे.