देशभरात गेल्या २ ते ३ महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात झालेली दरवाढ चर्चेचा आणि सरकारच्या विरोधाचा सूर बनला आहे. त्यामुळे, सरकारने टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आता लवकरच नेपाळमधून टोमॅटो भारतात येणार आहे. जवळपास ५ टन टोमॅटो पहिल्या खेपेत येत आहे. त्यामुळे, नागरिकांना आता स्वस्तात टोमॅटो खायला मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या टोमॅटोची विक्री कमी दरात करण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सरकारी संघ मर्यादित बुधवारी यासंदर्भात माहिती दिली.
उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना ५० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकत मिळणार आहे. एनसीसीएफने नेपाळमधून १० टन टॉमॅटोची ऑर्डर केली आहे. नेपाळमधून होत असलेल्या या आयातीसह एनसीसीएफ केंद्र सरकारकडूनही टोमॅटो खरेदी करणार आहे. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक एनीस जोसेफ यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, आम्ही नेपाळहून १० टन टोमॅटोची आयात करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी, मंगळवारी ३ ते ४ टन टोमॅटो उत्तर प्रदेशमध्ये वितरीत करण्यात आला आहे. अद्याप ५ टन टोमॅटो मार्गावर असून गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये या टोमॅटोची विक्री केली जाईल.
टोमॅटो लवकर खराब होणारी भाजीपाल्याची वस्तू आहे, म्हणून इतर राज्यात पाठवले जाणार नाही. केवल युपीमध्येच हा आयात केलेला टोमॅटो विकला जाईल, असेही जोसेफ यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात आयात करण्यात आलेला आणि केंद्र सरकारकडून खरेदी केलेला टोमॅटो ठोक विक्रेत्यांसह काही ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारेही विक्री केला जाईल. दिल्ली एनसीआर आणि राजस्थानमध्ये देशातील प्रमुख उत्पादन असलेल्या राज्यातून खरेदी केलेला टोमॅटो ५० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून नवीन टोमॅटोची आवक वाढली आहे, तसेच टोमॅटोच्या किंमतीतही उतार पाहायला मिळत आहे. देशभरात १५ ऑगस्ट रोजी टोमॅटोच्या किंमतीत मोठा दरकपात दिसून आली. सरासरी ८८.२२ किलो प्रति दराने टोमॅटो बाजारात विक्रीस असल्याचेही जोसेफ चंद्रा यांनी यावेळी सांगितले. देशात १ महिन्यापूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची सरासरी विक्री ११८.७ रुपये प्रति किलो एवढी होती.