त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० डिसेंबरच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याबाबत गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अयोध्या परिसरातील जमीन, आकाश आणि शरयू नदीवरही पाळत ठेवण्यात येत आहे. अयोध्येत एनएसजी, एटीएस, एसटीएफ कमांडोंना उतरविण्यात आले आहे. यासोबतच सर्व यंत्रणांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी तीन अप्पर पोलिस महासंचालक, १७ पोलिस अधीक्षक, ४० अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ८२ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ९० पोलिस निरीक्षक, ३२५ उपनिरीक्षक, ३३ महिला उपनिरीक्षक, २००० हवालदार, ४५० वाहतूक पोलिस कर्मचारी, १४ कंपनी पीएसी आणि ६ कंपनी पॅरा मिलिटरी सिक्युरिटी फोर्स अयोध्येत तैनात करण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण अयोध्येचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे.
का घेतली जातेय इतकी काळजी?
समाजकंटकांकडून घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच सतर्कता बाळगण्यात येत आहे. अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्यात येत असून, त्याच्या वाहनाचा क्रमांकही नोंदवला जात आहे. धुक्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येत येऊ शकले नाहीत. त्यांनी अयोध्येत तैनात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाच्या सर्व ठिकाणांचा आढावा घेतला असल्याचे सांगण्यात आले.