Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. अल्पावधीच कोट्यवधींचे दान राम मंदिराला प्राप्त झाले आहे. मात्र, एका तुरुंगातील कैद्याने तेथील श्रमातून मिळालेले पैसे रामचरणी अर्पण केल्याची माहिती समोर येत आहे. या कैद्याने दिलेला धनादेश श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर तुरुंगात असलेल्या झियाउल हसन या कैद्याने रामचरणी आपल्या मेहनतीचे पैसे दान केले आहेत. या कैद्याने १०७५ रुपयांची रक्कम रामलालाचरणी अर्पण केली. या कैद्याने तुरुंगात स्वच्छता करण्याच्या मजुरीतून मिळणारी दीड महिन्याची कमाई रामलाला यांना समर्पित केली. हसन हा फतेहपूरच्या रामजानकी पुरमचा रहिवासी आहे. जियाउलच्या विनंतीवरून कारागृह अधीक्षकांनी १०७५ रुपयांचा धनादेश अयोध्येला पाठवून दिला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हा धनादेश प्राप्त झाला आणि खात्यात जमा करण्यात आला.
आपली मजुरी रामललाचरणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त करत या कैद्याने कारागृह अधीक्षकांना सांगितले की, त्याची प्रभू श्रीरामांवर नितांत श्रद्धा आहे. श्रीराम सर्वांचे आहेत. तुरुगांतील श्रमाचे पैसे राम मंदिरासाठी समर्पित करण्यासोबतच येथून सुटल्यानंतर एकदा अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घ्यायची इच्छा बोलून दाखवली.
दरम्यान, मारामारी करणे तसेच अन्य गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आणि साडेतीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर तुरुंगात केलेल्या श्रमाचे जे पैसे मिळाले, ते रामचरणी अर्पण केले. विहिंपच्या शरद शर्मा यांनी या गोष्टीचे स्वागत केले आहे. तसेच एका मुस्लीम कैद्याने रामचरणी केलेले दान सामाजिक समरसतेचे ते ज्वलंत उदाहरण आहे. राम हा या देशाचा कणा आहेत, केवळ रामांच्या स्मरणाने स्वतःचे आणि समाजाचे कल्याण होते, असे म्हटले आहे.