सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर सस्पेन्स कायम आहे. रायबरेलीतून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने आहे. तसेच, प्रियांका गांधी फक्त निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय, काँग्रेसचे नेते राहुल गांधीअमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. याआधी राहुल गांधी हे अमेठीतून आणि प्रियांका गांधी या रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेऊ शकतात, असेही म्हटले जात होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण, राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.
रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्लारायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेवरून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. मात्र, यावेळी सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे प्रियांका गांधी येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, २०१९ मध्ये सोनिया गांधी यांनी ही आपली शेवटची लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले होते.
सोनिया गांधींनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली होती१९९९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी रायबरेलीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. यानंतर सोनिया गांधी एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. सोनिया गांधींनी रायबरेलीसोबतचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या खूपच भावूक झाल्या होत्या.