नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:24 PM2024-05-10T19:24:25+5:302024-05-10T19:26:34+5:30
Rahul Gandhi : आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
लखनौ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लखनौमध्ये राष्ट्रीय संविधान परिषदेला संबोधित केले. यावेळी आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. अशिक्षित राजा देखील व्यवस्थित काम करू शकतो, कारण तो लोकांचे ऐकतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा आहेत, ते लोकांचे काही ऐकत नाहीत. त्यांचे सर्व नेते आरक्षण संपवू असे सांगत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी म्हणतो की तुम्ही आरक्षण कधीच रद्द करू शकत नाही. ते (भाजप) संविधान, आरक्षण, लष्कर या सर्वांवर हल्ला करत आहेत… सत्य काय आहे... सत्य हे आहे की, मी जनतेचा आवाज आहे. पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. सर्वप्रथम भारताचे सामाजिक वास्तव देशासमोर मांडावे लागेल. कोणालाही दुखवू नका, कोणालाही धमकावू नका."
"जनतेच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या सहभागाची माहिती द्यावी लागेल. सीबीआय आणि ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान काय झालं… मी ईडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं की, तुम्ही मला इथे बोलावलं असेल, असा विचार करत असाल. तर हा तुमचा गैरसमज आहे. मी आलो आहे. मी का आलो हे तुला माहीत आहे. देशाच्या लोकशाहीची कोण हत्या करत आहेत, हे मला पहायचे आहे", असे राहुल गांधी म्हणाले.
"...म्हणून अदानी-अंबानींची आठवण काढत आहेत"
भारताला महासत्ता बनवायचे आहे. ९० टक्के लोकांना सहभागी व्हावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, "संस्थांमध्ये आरएसएसचे लोक भरणे, न विचारता अग्निवीर योजना राबवणे, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करणे…हे संविधानाशी छेडछाड आहे. पंतप्रधान आता स्वत:ला वाचवण्यासाठी अदानी आणि अंबानींची आठवण काढत आहेत. पण ते वाचू शकणार नाहीत, हे सत्य आहे."