लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये एका सरकारी महिला डॉक्टरवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याची घटना घडली. येथील हापुड जिल्ह्यात सरकारी महिला डॉक्टर स्वत:च्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: रुग्ण बनून महिला डॉक्टरचा भांडाफोड केला. संबंधित डॉक्टरबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:ची ओळख बदलून त्यांच्या रुग्णालयात प्रवेश केला. तिथे त्या डॉक्टरांनी १५ मिनिटे अधिकाऱ्याची तपासणी केली.
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हापुड येथील जिल्हा रुग्णालयातील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली गुप्ता यांच्यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पाठवलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई केली. डॉ. गुप्ता स्वत:च्या नोएडा येथील रुग्णालयात प्रॅक्टीस करत होत्या, तेव्हा त्यांना वरिष्ठांनी रंगेहात पकडले. या पथकातील एका व्यक्तीने रुग्ण बनून ६०० रुपयांची फी देऊन तपासणीसाठी प्रवेश घेतला होता. त्याचवेळी, आरोग्य विभागाच्या पथकातील दुसऱ्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि डॉ. रुपाली गुप्ता यांना रंगेहात खासगी प्रॅक्टीस करताना पकडले.
दरम्यान, याप्रकरणी सीएमओ सुनिल त्यागी यांनी म्हटले की, जिल्हा रुग्णालयातील डॉ. रुपाली गुप्ता यांच्याविरुद्ध सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या रुग्णांसोबत नीटनीटका व्यवहारही करत नसल्याचे सांगण्यात येत होते. सरकारी नोकरीत त्यांचं लक्ष नव्हतं. तसेच, दिव्यांग कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांच्या शिबिरातही त्या डॉक्टरांच्या पथकात सहभागी होत नव्हत्या. वैद्यकीय कामात टाळाटाळ करत, तसेच, महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही येथील जिल्हा रुग्णालयातून होत नव्हत्या. यासंदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या, तर, खासगी प्रॅक्टीस करत असल्याचेही सांगण्यात येत होते. त्यामुळे, जिल्हाधिकारी प्रेरणा शर्मा यांच्या आदेशान्वये २३ डिसेंबर रोजी डॉ. रुपाली गुप्ता यांच्या चौकशीसाठी एक पथक नेमण्यात आलं होतं.