Rajnikanth: सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या 'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, रजनीकांत सध्या उत्तर भारत दौऱ्यावर असून, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन जेलर चित्रपट पाहिला. भेटीदरम्यान, रजनीकांत यांनी योगींच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. सीएम योगींनी भेटीचा फोटो शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रजनीकांत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.
अखिलेश यांच्यासोबत भेटअखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अखिलेश आणि माझी 9 वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्या दिवसापासून आम्ही मित्र आहोत. आमचे अनेकदा फोनवर बोलणेही झाले आहे. पाच वर्षांपूर्वी मी यूपीत शूटिंगसाठी आलो होतो, तेव्हा अखिलेशची भेट होऊ शकली नाही, म्णूनच आज त्यांना भेटलो.
अयोध्योत रामललाचे दर्शन घेणार
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यासोबतची भेटही चांगली झाल्याचे सांगितले. यानंतर ते अयोध्येला भगवान राम ललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यादरम्यान त्यांना मीडियाने विचारले की, ते मायावतींनाही भेटणार आहेत का? यावर त्यांनी 'नाही' असे उत्तर दिले. दरम्यान, रजनीकांत यांची पत्नीदेखील त्यांच्यासोबत आहे.