UP Politics Akhilesh Yadav Rajya Sabha Elections: उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सपा-भाजपा आपापल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात व्यस्त आहे. सोमवारी रात्री भाजपा-सपाने आपापल्या आमदारांना डिनरसाठी बोलावले. त्यात सपाचे आठ आमदार डिनरला गेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत बाजी पलटणार आणि 'क्रॉस व्होटिंग' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सपा आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्यांमध्ये राकेश पांडे, राकेश सिंह, विनोद चतुर्वेदी, महाराजी प्रजापती, पूजा पाल आणि पल्लवी पटेल यांचा समावेश आहे. अभय सिंह आणि मनोज पांडे येणार नसल्याचेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या निवडणुकीत सपाच्या आमदारांनी क्रॉस व्होट केले तर अखिलेश यादव यांच्यासाठी अडचणी वाढू शकतील. कारण राजा भैय्या यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यसभेसाठी सपाकडून तीन उमेदवार घोषित करण्यात आले असून त्यात जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांचा समावेश आहे. सपाचे दोन उमेदवार सहज विजयी होतील, मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी ते अवघड जाणार आहे. अशा परिस्थितीत सपाचे आमदार डिनरसाठी न येणे हा अखिलेश यादव यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यसभेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार, भाजपाने आठवा उमेदवार उभा केल्याने खेळ बिघडला...
उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने आठ उमेदवार उभे केले आहेत. त्याचवेळी सपाकडून तीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपच्या सात उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, सपाचे दोन उमेदवार सहज विजयी होतील, परंतु भाजपने आपला आठवा उमेदवार उभे केल्यामुळे सपाची तिसरी जागा अडचणीत आली आहे.
कोणाकडे किती आमदार?
उमेदवाराला विजयासाठी ३७ मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सपाला आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी १११ मतांची गरज आहे. सपाच्या १०८ आमदारांमध्ये पल्लवी पटेल यांचाही समावेश आहे, ज्या सध्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. एनडीएमध्ये भाजपकडे 252 आमदार आहेत, अपना दल एसकेकडे 13, आरएलडीकडे 9, निषाद पक्षाकडे 6, सुभासपाकडे 6 आमदार आहेत. एकूण 286 आमदार एनडीएसोबत आहेत. राजा भैय्या यांच्या पक्षाचेही दोन आमदार भाजपाला पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसचे दोन आणि बसपचे एक आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नाही.
भाजपचे राज्यसभेचे उमेदवार
भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, माजी खासदार तेजवीर सिंह, माजी महापौर नवीन जैन, माजी मंत्री संगीता बळवंत, प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी आमदार साधना सिंह आणि संजय सेठ यांनी अर्ज दाखल केले आहेत.