हरदोई जिल्ह्याच्या माधौगंज तालुक्यातील एका विद्यार्थीनीच्या शरीरावर उमटेल्या रेषा सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या मुलीच्या शरीरावरील विविध भागांवर, विशेषत: हातावर राम राम.. आणि राधे.. राधे.. नावाचे शब्द उमटले आहेत. शाळेत शिकत असतानाच मुलीच्या शरीरावर ही नावं उमटल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर, त्यांनी कुटुंबीयांना बोलावून यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी, ही घटना गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. मात्र, डॉक्टरांनाही या समस्येबाबत स्पष्टपणे काही सांगता आले नाही.
सहिजना येथील देवेद्र त्रिपाठी यांची कन्या साक्षी (८) ही माधौगंज भागातील एका खासगी शाळेत इयत्ता पहिल्याच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या शरीरावर राम राम... राधे राधे... या नावांसह तिच्या कुटुंबातील सदस्यांचीही नावे व अंक दिसून येत आहेत. देवेंद्र यांच्या मतानुसार, गेल्या २० दिवसांपासून साक्षी आपल्या शरीरावर अशाप्रकारच्या रेषा ओढत होती. ज्या रेषा खरचटल्यासारख्या भासत होत्या. मात्र, आता या रेषांमध्ये नावं दिसून येत आहेत.
साक्षीचे वडिल देवेंद्र यांनी हरदोई येथील काही डॉक्टरांनाही याबाबत दाखवले होते. तर, खासगी रुग्णालयातही भेट दिली. मात्र, डॉक्टरांनाही नेमकी समस्या, आजार लक्षात आला नाही. सोमवारी साक्षीच्या हातावर राम, राधे हे नाव उमटल्याचं दिसून आलं. तर, शरीराच्या इतर भागांवर तिचे नाव व इतर नावेही दिसून आली.
विशेष म्हणजे १५ मिनिटांनी शरीरावरील त्याच भागांवरील तिची त्वचा नेहमीप्रमाणे साधारण झाली. साक्षीला कुठल्याही प्रकारचा त्रास, खाज किंवा इतर आजार नाही. याबाबत, सीएचसी अधीक्षक डॉ. संजय यांनी म्हटले की, हा त्वचासंबंधित आजार असू शकतो, मात्र तपासणीअगोदर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. दरम्यान, साक्षीला आता त्वचारोग तज्ज्ञांकडे दाखवण्यात येणार असल्याचे समजते.