Ram Mandir Ayodhya Pranpratishtha Celebrations: प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांवर आली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २२) दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातील २०० कलाकारांचे सादरीकरण
अयोध्येतील १०० ख्यातनाम स्थळांवर उत्तर प्रदेशातील लोकनृत्यांचे कलाकार तसेच सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातील २०० कलाकारांची सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांतील कलाकारही यात सहभागी होणार आहेत. रामनगरीतील प्राण-प्रतिष्ठेची संध्याकाळ पद्मश्री मालिनी अवस्थी आणि कन्हैया मित्तल यांसारख्या कलाकारांनी सुरेल होणार आहे. मालिनी अवस्थी यांचा कार्यक्रम तुळशी उद्यान येथे रात्री ८ ते ९ या वेळेत होणार आहे. तर कन्हैया मित्तल रामकथा पार्क येथे कार्यक्रम सादर करणार आहेत. उज्जैनचे शर्मा बंधू तुळशी उद्यानात सायंकाळी ७ ते ८ या वेळेत गंगेत स्नान करणार आहेत. याच काळात राम कथा पार्कमध्ये नागपूरच्या वाटेकर भगिनींचे सादरीकरण होणार आहे.
कसा असेल मुख्य सोहळा?
सकाळी १०:३० वाजल्यापासून निमंत्रितांचे मंदिर परिसरात आगमन होण्यास सुरुवात होईल. केवळ निमंत्रण असलेल्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा १२:२० वाजता सुरू होईल. अभिजित मुहूर्तावर होणाऱ्या मुख्य पूजेसाठी १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतचा ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे. वाराणसीचे आचार्य गणेश्वर द्रविड व आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात व १२१ पुरोहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील वस्त्र काढतील, त्यानंतर डोळ्याला काजळ लावतील, तसेच मूर्तीला सुवर्णवस्त्र परिधान करतील. दुपारी एक वाजता सर्व पूजा-विधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. सायंकाळी अयोध्यानगरी १० लाख पणत्यांनी उजळून निघणार आहे.