अयोध्या : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रमांची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचाच मुहूर्त, त्या दिवसाचे तिथीनुसार आणि पौराणिक महत्त्वही लक्षात घेण्यात आले. हा मुहूर्त निश्चित करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागला.
तिथी काय आहे?
हिंदू पंचांगानुसार, २२ जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशी आहे. या दिवशी मृगशिरा नक्षत्र असून सकाळी ८.४७ वाजेपर्यंत योगब्रम्ह असून त्यानंतर इंद्रयोग लागणार आहे.
हाच दिवस का?
२२ जानेवारीला कर्म द्वादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला होता. धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार, कासवाचा अवतार घेतल्यानंतर समुद्र मंथन केले होते. श्रीराम हे विष्णूचाच अवतार असल्याने राम मंदिराच्या उद्घाटनासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग आले आहे. शुभ कार्य करण्यासाठी हे योग महत्त्वाचे मानले जातात.
२३ जानेवारीपासून दर्शन
- प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर २३ जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.- दररोज सुमारे ३ लाख भाविक मंदिरात येतील, या दृष्टीने तयारी केली जात असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
८४ सेकंदाचा मुहूर्त महत्त्वाचा
- रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १२ वाजून २९ मिनिट व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिट व ३२ सेंकद हा ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त असल्याचे म्हटले आहे.
- ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लांचा अभिषेक करणार आहेत.
- वाराणसी येथील सांगवेद विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रवि़ड यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे. मेष लग्न व अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे.
- या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून याचवेळी सूर्य मध्यान्हावर येणार आहे. त्यावेळी सूर्य पूर्णतः तेजस्वी स्वरुपात राहणार आहे.
- रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा मेष लग्न व वृश्चिक नवांशामध्ये होणार आहे.
राममय होणार वातावरण
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १४ जानेवारीपासूनच अयोध्येतील विविध ठिकाणांवर रामायण, कीर्तन, रामचरित मानस कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
- त्यानंतर २४ मार्चपर्यंतही भरगच्च कार्यक्रम असल्याने संपूर्ण अयोध्यानगरी राममय होणार आहे.
1,111 शंखवादनाचा होणार विश्वविक्रम; सामूहिक शरयू आरती वेधणार लक्ष
अयोध्या : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच या दिवशी १,१११ शंखवादनाचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजविल्यास ईश्वराचा आशीर्वाद मिळतो, तसेच शंखाच्या ध्वनीने दोष दूर होऊन सकारात्मकता वाढत असल्याने प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. त्यानुसार अयोध्येतही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी १,१११ शंख वाजवले जाणार आहेत, तसेच सामूहिक शरयू आरती व शरीरसौष्ठव कलांचाही विश्वविक्रम करण्यात येणार आहे.