Ayodhya Hotel Rooms Booking: देशातील लाखो-करोडो लोक ज्या क्षणाची वाट पाहत आहेत, ते राम मंदिराचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. 20 ते 26 जानेवारी दरम्यान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील ट्रॅव्हल एजंट शहराकडे डोळे लावून बसले आहेत. या काळात हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळांमध्ये बुकिंगसाठी लाईन लागल्याची माहिती आहे.
अयोध्येतील एका लक्झरी हॉटेलच्या मालकाने मीडियाला सांगितले की, बहुतांशी बुकिंग रिक्वेस्ट ट्रॅव्हल एजंट्सकडून आल्या आहेत. हे रुम्स भाड्याने घेतात आणि नंतर राम मंदिराच्या उद्घाटनावेळी भाविकांना जास्त दराने भाड्याने देतात. मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवण्याच्या घोषणेनंतर अयोध्येसह बाहेरील लोकांमध्येही उत्साह वाढला आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे.
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही या सोहळ्याला 10,000 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार, राय यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधानांना 15 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यानच्या तारखा दिल्या आहेत. त्यामुळेच या काळात राम मंदिराचे उद्घाटन होण्याची दाट शक्यता आहे.
अयोध्येत किती हॉटेल आणि धर्मशाळा ?सध्या अयोध्येत एक फाईव्ह स्टार, दोन फोर स्टार आणि 12 थ्री स्टार हॉटेल्ससह 100 हून अधिक हॉटेल्स आहेत. याशिवाय, शहरात 50 अतिथीगृहे आणि तेवढ्याच धर्मशाळा आहेत. स्थानिक लोकही पुरेशी जागा असलेली त्यांची घरे होमस्टेमध्ये बदलत आहेत. अपेक्षित गर्दी लक्षात घेता, ऑनलाइन एजंट्सनी अयोध्येच्या आसपासच्या गोंडा, बलरामपूर, तारबगंज, डुमरियागंज, तांडा, मुसाफिरखाना, बन्सी इत्यादी ठिकाणी बुकिंगचे पर्याय देऊ केले आहेत. दरम्यान, हॉटेल मालकांनी आपली ठिकाणे स्वच्छ ठेवावीत आणि भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज राहावे, असे निर्देश अयोध्या प्रशासनाने दिले आहेत.