अयोध्या - अयोध्येत २२ जानेवारी २०२४ हा दिवस इतिहासात नोंद होईल. याच दिवशी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. अयोध्या मंदिरांचा गड मानला जातो. याठिकाणी एकापेक्षा एक मूर्ती, जवळपास ८००० मठ आणि मंदिरे आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध हनुमानाचे मंदिर. ज्याला हनुमान गढी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी साक्षात हनुमानजी सहवास असतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिराचे दर्शन न घेता रामलल्लाचे दर्शन पूर्ण होत नाही. हे मंदिर खूप काही रहस्यांनी भरले आहे. खूप कमी जणांना याची माहिती आहे. हनुमान गढीला इतकं महत्त्व का आणि या मंदिराचे गुप्त रहस्य काय हे जाणून घेऊया.
लंकेहून परत आल्यानंतर प्रभू रामाने हनुमानाला याठिकाणी राहायला जागा दिली होती. त्यामुळे हे हनुमानाचे घर आहे असं म्हटलं जाते. अथर्ववेदनुसार, प्रभू रामाने हनुमानाला सांगितले होते की, जो कुणी अयोध्येला माझ्या दर्शनासाठी येईल त्याला सर्वप्रथम तुझे दर्शन म्हणजे हनुमानाचे दर्शन घ्यावे लागेल. आजही लोक रामललाच्या दर्शनाआधी हनुमान गढी येथे येऊन दर्शन घेतात. हनुमान याठिकाणी आजही विराजमान आहेत. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येत दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही रामजन्म भूमी सुरक्षित राहिली. धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू राम गुप्तार घाटातून गोलुकला गेले, तेव्हा त्यांनी अयोध्येची जबाबदारी हनुमानावर सोपवली होती. रामाचा आदेश हनुमान कधीही मोडू शकत नाहीत. त्यामुळे आजही अयोध्येची जबाबदारी हनुमानाच्या हाती आहे.
अयोध्येतील हनुमान मंदिराची स्थापना ३०० वर्षापूर्वी स्वामी अभयारामदासी यांच्या निर्देशानुसार सिराजुद्दौलाने केली होती. हे मंदिर अयोध्येतील मध्य भागी मोठ्या टेकडीवर आहे. त्याच्या दक्षिणबाजूस अंगद आणि सुग्रीव यांचेही मंदिर आहे. या मंदिराची महिमा एवढा आहे की लोक ७६ पायऱ्या चढून हनुमानजीचे दर्शन घेतात. हनुमानजी आजही अयोध्येचा कारभार सांभाळतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. शरयू नदीच्या उजव्या तीरावर वसलेल्या हनुमानगढीच्या भिंतीवर हनुमान चालीसा आणि चौपैया लिहिलेल्या आहेत.
धार्मिक मान्यतांनुसार, भगवान हनुमानजी आपल्या भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. चोळा अर्पण केल्याने माणसाला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शरयू नदीत स्नान करण्याचीही मान्यता आहे, परंतु त्यापूर्वी लोकांना बजरंगबलीची परवानगी घ्यावी लागते. हनुमानगढीतील हनुमानजींची मूर्ती दक्षिणमुखी आहे. येथे दिसणार्या हनुमानाच्या खुणा लोकांना आश्चर्यचकित करतात. येथे चार मीटर रुंद आणि आठ मीटर लांब ध्वज आहे, जो लंकेवरील विजयाचे प्रतीक आहे. सोबत गदा आणि त्रिशूळही ठेवला आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी हनुमानाचे निशाण अयोध्येला नेले जाते. हनुमानगढीपासून रामजन्मभूमीपर्यंत सुमारे २० लोक ही पायी घेऊन जातात. आधी पूजा करून मग पुढच्या कामाला सुरुवात केली जाते.
हनुमानगढीसारखी गुप्त उपासना पद्धत खूप खास आहे. अशी पूजा देशात इतरत्र कुठेही होत नाही. हनुमानगढीमध्ये ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. वास्तविक, ही गुप्त पूजा आहे. ज्यामध्ये पुरोहितांशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ही पूजा पहाटे ३ वाजता होते, ज्यामध्ये पवनपुत्र हनुमान स्वतः पूजेत सहभागी ८ पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात. ही पूजा सुमारे दीड तास चालते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हे पुजारी या पूजेबद्दल कोणाला काही सांगत नाहीत आणि चर्चाही करत नाहीत. कारण त्यांचीही एक मर्यादा आहे. मंदिराचे दरवाजे पहाटे ४ वाजता भाविकांसाठी उघडतात आणि रात्री १० वाजेपर्यंत उघडे राहतात. तुम्हीही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर आधी रामभक्त हनुमानाचे दर्शन नक्की घ्या.