अयोध्या - प्रभू श्री राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा काही दिवसांवर आला आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्येत मोठा सोहळा रंगणार आहे. यात प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी रामाच्या ३ मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या प्रभू राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.
प्रल्हाद जोशी म्हणाले की, ज्याठिकाणी राम आहे त्याठिकाणी हनुमान आहे. अयोध्येत प्रभू राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. राम आणि हनुमानाच्या अतुट नात्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी कर्नाटकातून रामलल्लाची हे महत्त्वाची सेवा आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाणार असल्याचं पुढे आले आहे.
कोण आहे अरुण योगीराज?अरुण योगीराज हे कर्नाटकच्या म्हैसूर शहरात राहणारे आहेत. ते एका प्रसिद्ध मूर्तीकार कुटुंबातून येतात. त्यांच्या ५ पिढ्या मूर्त्या बनवण्याचं काम करतात. अरुण योगीराज हे देशातील प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक आहेत. देशातील विविध राज्यात अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीला सर्वाधिक मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या मूर्ती बनवण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. अरुणचे वडीलही उत्कृष्ट मूर्तीकार आहेत. लहानपणापासून अरुणला मूर्ती बनवण्याचा छंद जडला.
एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुण योगीराज यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु मूर्ती बनवण्याची कला काही लपून राहिली नाही. २००८ मध्ये कंपनीतून राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ मूर्तीकार म्हणून काम केले. इंडिया गेटवर असलेली ३० फूट उंच सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती अरुण योगीराज यांनीच साकारली आहे. केदारनाथ येथील आदि शंकराचार्य यांची १२ फूट उंच मूर्ती, म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकट्टे इथं २१ फूट उंच हनुमानाची मूर्ती, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामकृ्ष्ण, म्हैसूरच्या राजाची १४ फूट उंच मूर्ती यासारख्या अनेक मूर्त्या अरुण यांनी साकारल्या आहेत.