अयोध्या : रामललांच्या २२ जानेवारीला होणाऱ्या बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंगळवारी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विधींनी सुरुवात झाली. मंगळवारी प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा झाली. अयोध्येतील नवीन मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने याची सांगता होईल.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरू झाले असून ते अभिषेक समारंभापर्यंत सुरू राहील. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करून विधी करत आहेत, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले. अंतिम अभिषेकापर्यंत सर्व विधींचे यजमानपद ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा यांच्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारे विधी मिश्रा दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे.
प्रायश्चित, कर्मकुटी पूजा कशासाठी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी अनावधानाने काही चुका झाल्यास किंवा आतापर्यंतच्या एकूण कार्यात कमतरता राहिल्यास त्याबाबतचे प्रायश्चित म्हणून ही पूजा केली जाते. कर्मकुटी पूजा म्हणजे यज्ञशाळा पूजन होय. यामध्ये भगवान विष्णूंना आवाहन करून त्यांच्याकडून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळविली जाते.
रामललाच्या मूर्तीचे आज आगमनप्राणप्रतिष्ठा सोहळ्यापैकी बुधवारी (१७ जानेवारी) रामललांची मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन होणार आहे. गुरुवारी मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. तसेच तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास विधी पार पडणार आहेत.
२३ दिवसांत माेठे कामश्रीराम मंदिराचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. २४ डिसेंबर रोजी सुरू असलेले काम आणि मंगळवारी १६ जानेवारीपर्यंत झालेल्या कामातून त्याची प्रचिती येते. शिखरासह प्रवेशद्वारावर विराजमान असलेले सिंहदेखील दिसत आहेत.