वाराणसी - अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी हजारो जणांमधून एकाची निवड करण्यात आली होती. आता, हिंदू धर्मीयांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या काशी-वाराणसी धाममधील मंदिरासाठीही पुजारी पदासाठी निवड करण्यात येत आहे. काशी विश्वनाथ मंदिरासाठी एकूण ५० पुजाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार, मुख्य पुजारी पदासह कनिष्ठ पुजारी आणि सहायक पुजारी पदांसाठीही भरती होत आहे. त्यामध्ये, मुख्य पुजारी पदासाठी ९० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, येथील काशी विश्वनाथ मंदिर मुख्य पुजारी पदासाठी ९० हजार मानधन मासिक तत्वावर देण्यात येणार आहे. तर, कनिष्ठ पुजारी पदासाठी ८० हजार आणि सहायक पुजारी पदासाठी ६५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येईल.
काशी विश्वनाथ मंदिर न्यासच्या १०५ व्या बैठकीत ४१ वर्षांनतर पुजारी सेवा नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीवर बैठकीत एकमताने सहमती झाली. त्यामुळे, आता मंदिरासाठी पुजारी पदासाठी ५० जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंदिर पुजारी नियमावलीसह जिल्ह्यातील संस्कृत भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मंदिर न्यासकडून ड्रेस आणि पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. तसेच, मंदिर न्यासकडून संस्कृत ज्ञान स्पर्धेचंही आयोजन करण्यात येणार असून संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयास अनुदानही दिले जाणार आहे.
काशी-विश्वनाथ मंदिर न्यायची १०५ वी बैठक गुरुवारी कमिश्नरी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मंदिर न्यायचे अध्यक्ष प्रा. नांगेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीची सुरुवात मंदिराचे ट्रस्टी वेंकट रमन घनपाठी यांच्याकडून वैदीक मंत्रांद्वारे करण्यात आली. त्यानंतर, मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णूपालक मिश्रा यांच्याकडून गतबैठकीतील निर्णयांचे आणि त्यांच्या सद्यस्थितीचे वाचन करुन दाखवले, त्यावरही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत तब्बल ४ दशकांनंतर पुजारी सेवा नियमावरीलवर चर्चा होऊन नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.