देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून राजधानी दिल्लीतील राजपथावर देशाचा सोहळा संपन्न होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते झेंडा फडकवल्यानतंर देशभरातील सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. राजपथावर यंदा दैदिप्यमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांच्यासह दिगग्जांची उपस्थिती आहे. राजपथावरील यंदाच्या परेममध्ये वेगळेपण दिसून आलं. दरवर्षी सैन्याचा बँड वाजवून परेडला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा नवी सुरुवात पाहायला मिळाली. देशभरातील १०० महिलांनी सांस्कृतिक पारंपरिक वाद्य वाजवून परेडला सुरुवात केली. तसेच, शंखनादही झाला.
विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा होत आहे. राजपथावरील या परेडमध्ये १३,००० प्रमुख पाहुणे सहभागी होत आहेत. यंदा प्रथमच समाजातील सर्वच वर्गातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेता आला आहे. यंदाचा हा कार्यक्रमत दीड तांसाचा आहे. राजपथावरील या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून तब्बल १४,००० जवान प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून उभे आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राज्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक प्रदर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दिसून आले. या चित्ररथांवरील कलाकृती आणि संस्कृतीने देशावासीयांचे लक्ष वेधले. यंदाच्या चित्ररथात अयोध्येतील रामललाचेही देशवासीयांना दर्शन घडले. झारखंड, गुजरात, लदाख, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यातील संस्कृती दर्शवणारे चित्ररथही दिसून आले. त्यामध्ये, यंदाच्या अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची झलकच दिसली. उत्तर प्रदेशच्या चित्ररथात रामललाचे दर्शन घडले.
दरम्यान, भारतीय सैन्य दलाच्या हवाई आणि कर्तव्य पथावरील कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. भारतीय सैन्य दलाची ताकद यानिमित्ताने देशवासीयांना आणि जगालाही पाहायला मिळाली.